‘अस्मा’दिक आयुर्वेद

डॉ. अस्मा इनामदार या जन्माने पुणेकर. त्यांचे वडिल नसिर शेख हे उद्योजक.  त्यांमुळे त्यांचे बालपण पुण्यातच गेले. बारावीनंतर आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या भारती विद्यापीठात प्रवेश घेतला. बीएएमएसचे शिक्षण उत्तमरित्या पार पडले. इंटर्नशिपच्या काळात आयुर्वेदाचे ज्ञान वाढविण्यासाठी  डॉ. सुचेता गोडबोले यांच्याकडे जायला त्यांनी सुरवात केली. तिथूनच त्यांना आयुर्वेदची गोडी लागली. ग्रंथवाचन हा आयुर्वेदाचा मूळ मंत्र, ही डॉ. गोडबोले यांची शिकवण त्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे. डॉ. गोडबोले यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळातही त्या युरोपमध्ये प्रॅक्टिस करायच्या आणि परदेशी लोक त्यांच्याकडून पंचकर्म करून घेण्यासाठी भारतात येत असत. डॉ. गोडबोले या दिवसभरातल्या सगळ्या पेशंटच्या केसवर चर्चा करायच्या. एखादा आजार माणसाचा असो की इतर कोणत्याही जीवाचा असो, आयुर्वेद या विज्ञाननिष्ठ शास्त्राला काहीही अशक्य नाही, हे त्यातूनच समजत गेले. डॉ. गोडबोले यांच्याकडे पंचकर्म आणि आयुर्वेद जीवनशैली यांचे सविस्तर ज्ञान त्यांना मिळाले. इंटर्नशिप सुरू असताना अधूनमधून वैद्य समीर जमदग्नी यांच्या लेक्चरला डॉ. अस्मा यांचे जाणे होत असे. वैद्य जमदग्नी म्हणजे आयुर्वेदाचे महागुरु आणि उत्तम वक्ता. गुरूकुल परंपरेने जमदग्नींकडे शिकायला डॉ. अस्मा यांनी सुरवात केली.

 

जमदग्नी सरांच्या ‘विश्वामृत’चे विश्व बाहेरच्या विश्वापेक्षा खूपच वेगळे होते. आत शिरले की सगळे आयुर्वेदमय आणि सात्विक. आयुर्वेदाचा सुक्ष्म विचार आणि ‘रीडिंग बिटवीन द लाईन्स’ची क्षमता ही त्यांची देण. विश्वाचे अमृत आयुर्वेद हेच आहे, असा विश्वास त्यातून हळूहळू डॉ. अस्मा यांच्यात निर्माण होत गेला. आयुर्वेदातले निदान, चिकित्सा, औषधनिर्मिती हे सगळेच वैशिष्ट्यपूर्ण वाटत होते. हजारो वर्षांपूर्वी मानवी शरीरातल्या सुक्ष्मातिसुक्ष्म घटकांचा विचार करून त्या काळातल्या ऋषीमुनींनी या शास्त्राची उभारणी केली होती. आजच्या एकविसाव्या शतकातही आयुर्वेद पराकोटीच्या सुलभतेने आणि प्रभावीपणे लागू होतो, याचे कारण त्याचा आध्यात्मिक पाया आणि त्याचे वैज्ञानिक अधिष्ठान हेच आहे. अशा अनेक गोष्टींचे ज्ञान नव्याने होत होते. ते ज्ञान केवळ मेंदूत साठविले जात नव्हते, तर त्याच्या स्मृती अवचेतन मनाच्याही आतल्या कप्प्यात कायमच्या कोरल्या जात होत्या.
जमदग्नी सरांचा आदर्श घेऊन डॉ. अस्मा यांनी त्याच वर्षी पुणे कॅम्पात दवाखाना सुरू केला.  पेशंट येऊ लागले, पंचकर्मही सुरू केले. आजूबाजूच्या गावात शिबिरे घ्यायला सुरवात केली. या सगळ्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. आतापर्यंत पुस्तकात, कॉलेजात शिकलेले प्रत्यक्षात आणायची ही संधी होती. त्यात बर्यापैकी यशही मिळत होते. एकाच्या रेफरन्समधून दुसरा पेशंट मिळत होता. हे सुरू असतानाच डॉ. अस्मा यांच्या लग्नाची घरात चर्चा सुरू झाली. योग्य वर निवडून लग्न झाले. पण लग्नानंतर पुन्हा एक नवा विचार डॉ. अस्मा यांच्या डोक्यात सुरू झाला. लग्नानंतर नवरा दुबईला राहणार होता. मग पुन्हा धडपड सुरू झाली. आयुर्वेद आणि दुबई हे वेगळे आव्हान आणि संधीही होती. मग डॉ. अस्मा यांच्या पतीने दुबईच्या आरोग्य मंत्रालयात जाऊन सगळी माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी दुबईतली परीक्षा दिली. लेखी आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण होत संयुक्त अरब राष्ट्रे (युएई) मध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करण्याचे  लायसन्स त्यांनी मिळवले. डॉ. अस्मा यांनी जॉबसाठी केलेल्या अर्जाला प्रतिसाद म्हणून अबुधाबीवरून इंटरव्ह्यूसाठी फोन आला. अबुधाबी आणि दुबई म्हणजे मुंबई आणि पुण्याइतके अंतर. पण अबुधाबीमध्ये सगळे अरबी लोक राहतात. डॉ. अस्मा यांच्या सेंटरचा मालकदेखील अरबीच होता. तो एका एअर कार्गो कंपनीचा सीईओ होता. पण त्याला आयुर्वेदाची खूप आवड होती. अशारितीने सगळी सुत्रे जुळून आली आणि युएईमध्ये डॉ.अस्मा यांचा आयुर्वेदाचा प्रवास सुरू झाला. तिथपासून अथक प्रयत्न करून, आयुर्वेदाशी एकनिष्ठ राहून, गुरूंनी घालून दिलेल्या आदर्शांचे पालन करून आणि आयुर्वेदाचा सतत अभ्यास करून काम करत राहिल्या. या सगळ्याचा परिपाक म्हणून आज डॉ. अस्मा यांची दुबई आणि अबुधाबी आशी दोन ठिकाणी सेंटर्स आहेत.

 

दुबईत 2017 साली झालेल्या ‘आयुष कॉन्फरन्स’मध्ये डॉ. अस्मा यांचे बर्याच वर्षांपूर्वीचे सहकारी आणि मित्र वैद्य हरिश आणि वैद्य स्नेहल पाटणकर यांची भेट झाली. हे दोघे म्हणजे आयुर्वेदातले ‘पॉवर कपल’. त्याच कॉन्फरन्समध्ये केशायुर्वेदला पोस्टर प्रेझेंटेशनसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. तेव्हाच डॉ. अस्मा यांनी ठरवले आणि केशायुर्वेदची फ्रँचायजी घेतली. केशायुर्वेद म्हणजे आयुर्वेदाला आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाची जोड. आजच्या काळाची गरज जाणून केशायुर्वेदने केलेला हा एक उत्तम पराक्रमच म्हणायला पाहिजे. केशायुर्वेद हा केवळ एक ब्रँड किंवा मशीन नाही तर या संकल्पनेच्या मागे तज्ज्ञांची एक भली मोठी टीम ठामपणे उभी आहे. ही टीम केसाचे मुळापासून टोकापर्यंत मायक्रोस्कोपिकली आणि मॅक्रोस्कोपिकली परीक्षण करते. तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य ते उत्तम लॅब टेक्निशियन असे सगळे या टीममध्ये आहेत. त्यामुळे यातून मिळणारा रिझल्ट हा खात्रीशीर आहे. त्याच्या जोरावरच केशायुर्वेदने आजमितीला भारत आणि भारताबाहेर 100 शाखांचा पल्ला ओलांडला आहे.
केशायुर्वेद या नावाचे विशेष महत्त्व आहे. मागच्या वर्षी डॉ. अस्मा आणि त्यांच्या सहकार्यांनी युएई, दुबई, अबुधाबी, शारजा इथल्या डॉक्टरांसाठी केशायुर्वेदवर व्याख्यान आयोजित केले होते. रमजानचा महिना, रोजे आणि गर्मीमुळे कोणी या व्याख्यानाला येणार नाही, असे तिथल्या कार्यकारिणीच्या सदस्यांचे मत होते. तरीही डॉ. अस्मा, त्यांचे सहकारी आणि पाटणकर यांनी सांगितले की आपण हे व्याख्यान आयोजित करुयात. प्रत्यक्षात व्याख्यानाच्या वेळी सभागृह तुडूंब भरले होते. लोक उभे राहून ऐकत होते. रोजा सोडण्याची वेळ झाली तरी प्रेक्षक आणि वैद्य याची प्रश्नोत्तरे सुरूच होती.
केशायुर्वेदाचा प्रचार जाहिरातीपेक्षा माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून खूप चांगल्या रितीने झाला आणि होत आहे. डॉ. अस्मा यांना आणि त्यांच्यासारख्या फ्रँचायजी धारकांना इतर डॉक्टरांकडून पेशंटचे रेफरन्सेस मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिरे, जागरूकता कार्यक्रम अशी कामे समाजसेवा म्हणून डॉ. अस्मा करताहेत. आज युएईसारख्या देशात दोन सेंटरच्या मेडिकल डायरेक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. या परिसरातच नव्हे, तर परिसरापलीकडे आणि देशाबाहेरही डॉ. अस्मा यांना मानसन्मान मिळतो. या सगळयाचे श्रेय अर्थातच आयुर्वेद आणि डॉ. पाटणकर यांना जाते, अशी भावना डॉ. अस्मा व्यक्त करतात.
 डॉ.अस्मा इनामदार यांना केशायुर्वेदसाठी त्यांनी केलेल्या उलेखनीय कामाबद्दल 2018 मध्ये केशायुवेद भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.